Tuesday 31 October 2017

मुंबई - मला भावली तशी


एक चतुर्थांश शतकापेक्षा जास्त काळ मुंबईच्या बाहेर घालवल्यानंतर मी नोकरीसाठी मुंबईत आलो, पुण्यात माझे सर्व कुटुंब सोडून. त्या वेळी काही लोक आनंदी होते, काही अस्वस्थ झाले आणि काही जण माझ्या या निर्णयाबद्दल आश्चर्यचकित झाले, परंतु ही एक वेगळी कथा आहे.......
 
तर तेव्हा मुंबईत आल्यावर मी काही सहकाऱ्यांसह गोरेगांव पूर्वेला रहायचो. दिवसभराचा कार्यक्रम एकाच होता, सकाळी कंपनीच्या बसने कार्यालयात जायचे आणि कंपनीच्या त्याच बसने संध्याकाळी परत यायचे. जिथे रहात असे त्याला "घर" म्हणावं असं तिथे काहीही नव्हतं! "बॅचलर अकोमोडेशन" मध्ये एका सदनिकेत भारताच्या चार वेगवेगळ्या भागांतून आलेले आम्ही चार जण राहात होतो. तिथे मध्ये माझ्या नावे एक खाट आणि एक कपाट त्या दोनच गोष्टी होत्या. अन्य कोणी आले तर त्यांची बसायचीही सोया नव्हती!

महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार, व सगळे रविवार सुट्टी असे. आणि या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी मी पुण्याला पळत असे. पहिल्या व तिसऱ्या रविवारी पुण्याला गेलो नाही तर मालाड पश्चिमेकडे इन-ऑर्बिट किंवा हायपरसीटी मध्ये खरेदी करण्यासाठी जात असे किंवा मुंबईच्या अन्य भागांमध्ये फिरत असे. लहानपणी जी मुंबई मी सोडून गेलो होतो तिच्याशी अशी परत ओळख होत होती......
 
होय, माझा जन्म दादरचा (तेच सर्व एरियाचं फादर असलेलं दादर!) आणि म्हणून म्हणत असे, "मी मुंबईत माझ्या वयाच्या शून्य ते आठ वर्षे राहात होतो."
 
लोकल ट्रेन ही त्या काळीही लाईफ लाईनच होती मुंबईची! तेव्हा लोकलमध्ये ९ डबे असत, आजच्यासारखे १२ नाही. आणि १५ डबा लोकल भविष्यात येईल असे कोणालाही वाटले नसेल तेव्हा! लोकलच्या डब्यात सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळीही बऱ्यापैकी जागा असे. लोकल गाडी वळणावर असेल तेव्हा गाडीचा वळणावरचा अंतर्गोल दिसणारा भाग बघायला मला आवडत असे. त्यासाठी मी गाडी ज्या बाजूला वळेल त्या बाजूच्या खिडकीत धावत जात असे. पण आज गाडीतल्या गर्दीमुळे एका बाजू कडून दुसऱ्या बाजूकडे जाण्याचा असा विचारच फक्त मनात येऊ शकतो. मग ठाण्याहून ट्रान्स हार्बर रेल्वेने जाताना उजव्या खिडकीतली जागा पकडून ऐरोलीच्या दिशेच्या वळणावर मागचे पुढचे डबे बघायला मिळतात त्यावर समाधान मानावे लागते!   







ठाण्याहून ऐरोलीला वळणारी लोकल


मुंबईतील विहार तलाव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हँगिंग गार्डन, राणीचा बाग आणि अर्थातच गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी मी भेट दिली होती. माझ्या विहार तलाव आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भेटींबद्दल मला फारच अस्पष्ट आठवणी आहेत परंतु हँगिंग गार्डन मधील म्हातारीच्या बुटातल्या जिन्याने वर गेल्यावर बाबांनी खालून माझे प्रकाशचित्र घेतल्याची आठवण आहे. 



ट्रेलर प्रकारची बस
बेस्टची ट्रेलर प्रकारची बस माझी आवडती होती. दुर्दैवाने काही अपघातांमुळे ती सेवेतून काढून टाकली गेली. या प्रकारच्या बसच्या वरच्या मजल्यावर सगळ्यात पुढच्या आसनावर बसून समोरची खिडकी उघडी ठेवून चेहऱ्यावर जोराचा वारा घेत प्रवास करणे हा एक भन्नाट अनुभव होता आणि आहे!  तिथून ९ १० फूट खालचा रस्ता आणि रस्त्यावरच्या अन्य गाड्यांचे टप पाहणे हा अनुभव वर्णन नाही करता येणार!! या ट्रेलर बसला चालकाचे वेगळे केबीन असते आणि प्रवाशी बसण्याचा दुमजली कक्ष त्याला एका मजबूत सांध्याने जोडलेला असतो. बस वळताना आधी हे केबीन वळते आणि नंतर प्रवासी बसण्याचा कक्ष वळतो. वरच्या मजल्यावरच्या सगळ्यात पुढच्या आसनावर बसून ही केबीन दिसते. मी कल्पना करत असे की त्या चालकाच्या जागी मी आहे वरच्या खिडकीतून मी स्वतःलाच बघतोय!! कुलाबा ते माहीम असा "क्रंमांक एक"चा बस मार्ग होता तेव्हा. तो कधी कधी कुलाबा ते शिवाजी उद्यान किंवा रा ग गडकरी चौक इथपर्यंत संपत असे. दिशा बदलून पुन्हा कुलाब्याला जाण्यासाठी ती बस गोखले रस्त्यावरून रानडे रस्त्यावर वळत असे आणि सेनापती बापटांच्या पुतळ्याला वळसा घालून ब्राम्हण सहाय्यक संघावरून पुन्हा गोखले रस्त्यावर येत असे. बाबांबरोबर कधीतरी हा छोटासा फेरफटका केल्याचंही आठवतंय!

मुंबईतल्या काही मोजक्या किल्ल्यांपैकी शीवचा किल्ला हेही एक प्रेक्षणीय स्थळ आहे. आताच्यासारखी गर्दी नसे तेव्हा तिथे. दिवसभर शांतपणे फिरता येत असे. लहानपणी एकदाच गेलो होतो तिथे. 

या आणि अशा बऱ्याच लहानपणीच्या आठवणी, थोड्या बरोबर घेऊन, थोड्या मागे ठेवून आम्ही मुंबई सोडली. पण काही ना काही कारणांनी मुंबईला येणं चालूच होतं. असंच एकदा एका कार्यक्रमासाठी मुंबईत आलेलं असताना मित्रांबरोबर गिरगांव चौपाटीवर उभं राहून भरतीच्या लाटा अंगावर घेत अख्खी दुपार काढली होती. मग चर्चगेटला एका हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवून टॅक्सीने दादरला आलो होतो. "जीवाची मुंबई करणे" बहुतेक यालाच म्हणतात!

असं मुंबईला येणं जाणं चालूच होतं, पण आता दीर्घ कालावधीसाठी परत मुंबईत येण्याचा योग होता बहुतेक. "पायाभूत सुविधा" अर्थात infrastructure project या प्रकारात मोडणाऱ्या एका मोठ्या बांधकाम प्रकल्पाचा भाग होण्यासाठी मी पुणे सोडून परत मुंबईत आलो आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी चालून आली! कालांतराने कुटुंबाचेही स्थलांतर मुंबईत झाले आणि पुन्हा या सर्व ठिकाणांना भेटी देणे चालू झाले. 



म्हातारीचा बूट - २०११ मधील प्रकाशचित्र

महाराष्ट्राची राजकीय आणि भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अनेकांना सामावून घेते आणि उपजीविकेचे साधन पुरविते. भारताचं सर्व प्रकारे प्रातिनिधीत्व करते. गेल्या काही वर्षांत लोकल गाड्यांमध्ये, बसमध्ये गर्दी वाढली आहे, रस्त्यावर रहदारी वाढली आहे. या गर्दीला सामावून घेण्यासाठी , मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बाहेरगावीच्या गाड्यांसाठी जास्तीच्या मार्गिका उभरून लोकल गाड्यांची वाहतुक अबाधित ठेवणे, मोनो व मेट्रो रेल्वे, विमानतळाची क्षमता वाढवणे, संपूर्ण नवा विमानतळ बांधणे असे व या सारखे अन्य महत्वाकांक्षी प्रकल्प राबवले गेले आहेत आणि राबवले जात आहेत. यातून भरपूर रोजगार निर्मिती झाली आहे, भैष्यातही होईल. मग याच रोजगाराच्या आशेने उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षा ठेवून भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक इथलेच होऊन जातात, मुंबईच त्यांची कर्मभूमी होते. हीच मुंबई गरज पडली तर आपलं स्पिरिट, आपला आत्माही दाखवते. पण इच्छा हीच राहील की  आत्मा दाखवण्याची अशी वेळ पुन्हा येऊ नये!

मुंबईत आल्यावर माझ्या व्यावसायाशी संबधीत ज्ञानात आणि अनुभवात अफाट वाढ झाली आणि त्याचबरोबर माझं सामाजिक आयुष्य अर्थात social circle सुद्धा खूप वाढले. सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेणे सुरू झाले. दादरला ज्या शाळेत होतो लहानपणी त्या मित्र मैत्रिणींशी पुन्हा ओळख झाली, प्रकाशचित्रण कलेशी मैत्री झाली आणि वाढली. हा लेखनाचा उद्योग सुरू केला आणि बऱ्यापैकी लोकप्रियही झाला. म्हणूनच मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमानही वाटतो की मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्मभूमीही आहे!

उद्या, ०१/११/२०१७ रोजी मुंबईत परत येऊन एक दशक होईल. यानिमित्ताने माझं व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्य असेच वृद्धिंगत होत राहील अशी आशा आणि अपेक्षा ठेवून आजच्या पुरता हा लेखनाचा उद्योग थांबवतो. 

दिवस तीनशे चारवा पण तीनशे चारावे 

मुलुंड मुंबई 
३१/१०/२०१७













4 comments:

  1. Hard to believe that one could move inside a local "daba", once upon a time ;).

    ReplyDelete
    Replies
    1. हो! हे शक्य होतं कोणे एके काळी!!

      Delete
  2. लेखन खुप छान.

    ReplyDelete
  3. छान लेख. उपक्रम स्तुत्य आहे.

    ReplyDelete